इतिहास

परिषदेची स्थापना:- (27 मे 1906)

राठी भाषा आणि साहित्य यांची जपणूक, विकास व प्रसारासाठी ज्या संस्था सातत्याने कार्यरत आहेत, त्यापैकी सर्वात आद्य संस्था म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद. त्या दृष्टीने म.सा.प.ही ज्येष्ठ आणि प्रातिनिधिक साहित्य संस्था आहे. 1906 साली पुणे येथे चौथ्या ग्रंथकार संमेलनात या संस्थेची स्थापना झाली. त्या पूर्वी साहित्य प्रसाराचे काम सार्वजनिक ग्रंथालयांमार्फत चालत असे. एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात आपल्या येथे इंग्रजी राजवट सुरु झाली आणि विविध ज्ञान शाखांची ओळख आपल्याला झाली.

मुद्रण कला, आधुनिक शिक्षण, विद्यापीठे, रेल्वे, पोस्ट, तारायंत्र, छापखाने, वृत्तपत्रे, ग्रंथ छपाई इ. नवीन उपक्रमांची ओळख जनतेला झाली. नव शिक्षितांची पिढी नव्या जोमाने तयार झाली. मुंबईचे बाळशास्त्री जांभेकर, दादाभाई नौरोजी, दादोबा पांडुरंग, विष्णुबुवा ब्रह्मचारी इ.विद्वान आणि पुण्यातील लोकहितवादी, महात्मा फुले, चिपळूणकर पितापुत्र, न्यायमूर्ती रानडे, टिळक, आगरकर अशांसारखे समाजधुरीण नव विचार घेऊन पुढे आले. मराठी ग्रंथ प्रसाराच्यादृष्टीने मोलाचे काम गोपाळ हरी देशमुख आणि न्या.महादेव गोविंद रानडे यांनी निष्ठेने केले. लोकहितवादींनी पूना नेटिव जनरल लायब्ररी (सध्याचे लक्ष्मी रोड वरचे पुणे नगर वाचन मंदिर) ची स्थापना 1848 साली केली. त्यापूर्वी अहमदनगरला मिशनऱ्यांनी महाराष्ट्रातील पहिले ग्रंथालय सुरू केले होते. मुंबई, नाशिक, रत्नागिरी, ठाणे इथेही एकोणिसाव्या शतकात ग्रंथालये सुरू झाली होती.

छापखान्याची कला माहीत झाल्याने पुस्तकेही प्रकाशित होऊ लागली. त्यांपैकी ठळक पुस्तके सांगायची झाल्यास, यमुना पर्यटन - बाबा पदमनजी (1863), ल.मो.हळबे कृत मुक्तामाला (1861), मोरोबा कान्होबा कृत घाशिराम कोतवाल (1863) गो.ना.माडगावकर कृत मुंबईचे वर्णन (1863) अशी सांगावी लागतील.

आधी अनुवादित आणि नंतर स्वतंत्र पुस्तक निर्मिती बरोबरच मराठीतील दर्पण प्रभाकर. ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, निबंधमाला, मासिक मनोरंजन, विविधज्ञानविस्तार इ.महत्त्वाची नियतकालिके प्रसिद्ध होऊ लागली. या सर्व बाबी ग्रंथ निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत्या. मुद्रण कलेमुळे एकोणिसाव्या शतकात फार मोठी वैचारिक क्रांती झाली. महात्मा जोतिबा फुले, न्या.रानडे आदी विचारवंत नेते सर्वच बाबतीत नवे विचार पेरत होते. प्रबोधन युगच अवतरले होते. तात्विक वादविवाद झडत होते. या वादविवादांची परिणती विधायकतेकडे वळावी यासाठी लोकहितवादी आणि रानडे जागरूक होते. 1878 साली त्यांनी ग्रंथकार संमेलन भरवले. समाज जागृतीबरोबरच सामाजिक ऐक्य साधणे हा या संमेलनाचा हेतू होता. त्या आधी पुण्यात पुणे सार्वजनिक सभा 1870 मधे स्थापन झाली होती. तिच्या पाठोपाठ वक्तृत्त्वोत्तेजक मंडळी, सत्यशोधक समाजाचीही स्थापना झाली होती. याच बरोबर दर्जेदार वाङ्‌मय निर्मितीही होत होती. या साऱ्या घटना आणि प्रसंगांची पार्श्र्वभूमी ग्रंथकार संमेलनाला लाभली होती.

1865 साली न्या.रानडे यांनी मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा घेतलेला दिसतो. त्यानुसार 431 गद्य आणि 230 पद्य पुस्तकांची निर्मिती झाल्याचे दिसते. ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या.रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञान प्रकाश (7 फेब्रुवारी 1878) मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार 11 मे 1878 रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. संमेलनाध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले. दुसरे ग्रंथकार संमेलन 1885 साली पुण्यातच भरले. या संमेलनाला पहिल्याच्या मानाने चांगली म्हणजे शे सव्वाशे नामवंत ग्रंथकारांनी उपस्थिती लावली होती. 21 मे 1885 रविवार, दुपारी 4 वाजता पुणे सार्वजनिक सभेच्या (दाणे आळी, बुधवार पेठ) जोशी हॉल मधे हे संमेलन भरले होते.

या नंतर जवळ जवळ वीस वर्षांनी तिसरे ग्रंथकार संमेलन 1905 च्या मे मधे सातारा येथे भरले. लो.टिळकांचे एक सहकारी साताऱ्यातले सुप्रसिद्ध वकील र.पां.ऊर्फ दादासाहेब करंदीकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. 23 मे च्या केसरीत या संमेलनाचा त्रोटक वृत्तांत प्रसिद्ध झाला होता. साताऱ्या पाठोपाठ चौथे ग्रंथकार संमेलन पुणे येथे 27 मे 1906 शनिवार, रविवार रोजी सदाशिव पेठेत नागनाथपाराजवळच्या मयेकर वाड्यात भरले होते. हे संमेलन आधीच्या संमेलनांपेक्षा यशस्वी झाले, विधायक स्वरूपाचे झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी, ग्रंथकार आणि भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर होते. त्या वेळची अनेक मान्यवर ग्रंथकार मंडळी संमेलनासाठी एकत्र आलेली होती. निबंध वाचन, भाषणे, ठराव यामुळे संमेलन दोन दिवस गाजले.

© महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. सर्व हक्क राखीव.
Website designed by Dimakh Consultants , Marathi web technology development & content management by Marathiwebsites.com