परि अमृतातेही पैजा जिंके
विश्व स्वधर्म सूर्ये पाहो॥
बोलतो मराठी
अवघे विश्व तरावे
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे
26, 27 मे 2008 रोजी म.सा.प.ने आपला शतकोत्तर दुसरा वर्धापनदिन साजरा केला. आपणाला सांगायला फार आनंद होतो की दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या स्मृतिदिन व पारितोषिक समारंभाव्यतिरिक्त अनेक नवीन उपक्रम म.सा.प.ने सुरू केले आहेत. त्याची सविस्तर माहिती आपणास व्हावी म्हणून हा लेखन प्रपंच.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे विविध व्याख्यानांचे आयोजन वर्षभर करण्यात येते. त्यापैकी पाच दिवसांची का.र.मित्र व्याख्यानमाला ही अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी व्याख्यानमाला आहे. विविध पुरस्कारांचे आयोजन म.सा.प.करते. त्यापैकी काही विशेष पुरस्कार आहेत, तर काही ग्रंथ पुरस्कार आहेत. दरवर्षी उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीसाठी लेखकांना पुरस्कारित करण्यात येते. काही पुरस्कार व्यक्तीच्या विशेष कार्यासाठी त्या कार्याचा विशेष गौरव म्हणून दिले जातात. काही पुरस्काराचे वितरण एखाद्या व्यक्तीचे स्मरण म्हणून विशिष्ट दिवसासाठी वितरीत होतात. ते परिषदेकडे आलेल्या विशिष्ट देणगीतून वितरीत केले जातात.
वाङ्मय निर्मितीवर आपला विशेष ठसा उमटवणाऱ्या लेखकांचे स्मृतिदिन परिषद विशिष्ट तारखांना करीत असते. त्या विशिष्ट दिवशी त्या व्यक्तीच्या नावाने एखादा पुरस्कार देऊन एखाद्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. अनेकदा दिवंगत लेखकांच्या सुहृदांनी यासाठी परिषदेकडे देणग्या सुपूर्द केलेल्या असतात.
परिषदेतर्फे महाराष्ट्र साहित्य पत्रिका हे त्रैमासिक काढण्यात येते. गेली 96 वर्षे ही पत्रिका अखंडित संपादित होत आहे. काही दर्जेदार विशेषांकांचे प्रकाशन आत्तापर्यंत करण्यात आलेले आहे.
म.सा.प.तर्फे काही दर्जेदार प्रकाशने व कोष वाङ्मय प्रकाशित होत असते. वाङ्मयीन इतिहासाच्या सातव्या व आठव्या खंडाचे काम डॉ.रा.ग.जाधव यांच्या संपादनाखाली सध्या सुरू आहे.
म.सा.प.ची साहित्यिक साहाय्य निधी ची योजना महत्त्वाची असून आत्तापर्यंत काही लेखकांना ही सेवा आदराने दिली जात आहे.
संगणकीय सोयींनी ग्रंथालय सुसज्ज करावे असाही प्रयत्न आहे. म.सा.प.चे ग्रंथालय हा संस्थेचा मानबिंदू आहे. अनेक ग्रंथ आणि कोषवाङ्मयाने सुसज्ज अशा ग्रंथालयाचा लाभ आज अनेक अभ्यासक, लेखक, समीक्षक घेत आहेत. अनेक दुर्मिळ ग्रंथ व साहित्यिकांची छायाचित्रे हे ग्रंथालयाचे वैभव आहे
सावित्रीबाई फुले वाचनालय ही योजना फक्त विद्यार्थीनींसाठी उपलब्ध असलेली खास सोय परिषदेने सुरू केली आहे.